Friday 19 March 2010

माय मराठीचे श्लोक…!!

( वृत्त – भुजंगप्रयात )
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रम्हांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकात एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष “हर हर महादेव” झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
“अभय” एक निश्चय मनासी करावा
ध्वजा शीव ओलांडुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!


गंगाघर मुटे “अभय”

श्री  गंगाधर मुटे हे अतिशय प्रतिभावान कवी व लेखक आहेत. त्याच्या साहित्याचा [ रान मोगऱ्याचा ] सुगंध तुम्ही या वेबसाईट वर घेऊ शकता. 
सदर श्लोक हे कवीच्या परवानगीने इथे प्रकाशित केले आहेत. इतर कुठे ही प्रकाशित करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घ्यावी.

1 comment:

  1. श्रीमद्‍ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.

    ऐकण्यासाठी

    http://www.baliraja.com/node/446

    येथे क्लिक करा.
    ----------------------------
    गायक - विनायक वानखेडे
    गीत- गंगाधर मुटे
    तबलावादक - प्रविण खापरे
    हार्मोनियम - सुरेश सायवाने

    ReplyDelete