Friday, 31 August 2007

परवाच्या पावसात ..

परवाच्या पावसात
झोपडपट्टीतील एक मूल
वाहून गेले बुडून मेले

बूडाले तर बुडू द्या
मूल बुडाले म्हणजे काही
सात तारयाचे ताजमहाल
किंवा ब्रेबोर्न स्टेडिअम बुडाले नाही

आणि झोपडपट्टीतील त्या उघड्या नागड्या मूलाचे
असे मूल्य तरी किती?
साधे गणित येत असेल तर करता ये ईल हिशेब
उत्तर अर्थात पैशातच

हे मत तुमचे माझेच अहे असे नव्हे
त्याच्या आईचेही तेच असावे
कारन मूलाचे कलेवर मांडीवर घेऊन
ती फोडीत बसली असता
एक कर्कश हंबरडा
वस्तीवर एक वार्ता येऊन कोसळली
यावेळी मात्र करुणामय मेघासारखी

वार्ता:
नाक्यावरचा गुदामवाला व्यापारी
कुजलेल्या धान्याची पोती
ओतीत सुटला आहे उकिरड्यावर

बाईने आपला हंबरडा आवरला
घशात अर्ध्यावरच
अन मांडीवरचे कलेवर खाली टाकून
घरातल्या उरल्या सुरल्या पिशव्या गोळा करुन
ती बेफाम धावत सुटली
उकिरड्याकडे वाहणारया यात्रेत सामील होण्यासाठी

कुसुमाग्रज
thumbsup