Sunday 23 March 2008

मैत्री

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते... फक्त जरा समजून घे
'नातं' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं.. दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस

contribution - milind khare

Tuesday 18 March 2008

ये भैया

ये भैया........साल्या ज़रा कमी काम कर
आमच्या मराठी माणसाला काम दान कर
हात हलवत साल्या मुंबईत आलास
मराठी माणसाला वाटतय.....महाराष्ट्रापासून पोरका केलास..!!

दिवस भर काम करून उशिरा झोपतोस
थंडी असून सुद्धा रात्री ३ ला उठतोस.....
मराठी माणसाला नाही रे जमत
पण तू ४ ला वाशी मार्केट कसं काय गाठतोस

काय रे बाबा कुठल्या हाडामासाचा बनलास
अति श्रम करून पण न कधी दमलास
लोक म्हणतात तुला आत्ता माज चढलाय
पण मला वाटतय तुझ्यातच मेहनती माणूस दडलाय

मराठी माणसाची आधीच बोंब
कोणीतरी पेटवतो मग आगेचा डोंब
गाढवा सारखा मग वागू लागतो
उद्याच्या महाराष्ट्राची स्वप्ने बघू लागतो

विरारला रहायच, १० ला चर्चगेट गाठायचं
५.३० ला सुटलो की प्रेयसिला भेटायचं
मराठी माणसाने शोधलेला वडापाव
शेजवान जम्बो किंग च्या नावाने रेटायचं

माझ्या मराठी माणसाची नाही रे लांब उडी
नाकी नऊ येतात बसवताना संसाराची घडी
किती कधी कसे मिळतील.....पैसे याचाच विचार करतो
१५ हजरात मिळणा-या अनंदासाठी मर मर मरतो

का नाही करत तो तुझ्या सारखी मेहनत
आणू शकतो रे तो ही......इंद्राचा ऐरावत
समजू नको त्याला तू असा आळशी
गावभर हिंडतोय रे तो असून काखेत कळशी



सहभाग - milind khare

Tuesday 4 March 2008

उफराटे हिशोब

उफराटे हिशोब माझे
कोणाला कळले होते
मन ओले होते माझे
अन् म्हणून जळले होते

मी वजा जमेतून होतो
अन्‌ जमा वजेस्तव होतो
हे गणित समजले तेंव्हा
आयुष्य निवळले होते

नवनीत सुखाचे आले
शब्दांच्या पात्रांवरती
मी आईच्या हातांनी
बघ दुःख घुसळले होते

जगण्याच्या पानावरती
स्वप्नांशी जमल्या गप्पा
मग मुहूर्त मरणाचेही
कंटाळून टळले होते

दुसर्‍या दिवशी दुःखांचा
बघ वासही आला नाही
नयनांचे पेले माझ्या
रात्रीच विसळले होते

--- संदीप खर