Tuesday, 16 September 2008

एका तळ्यात होतीएका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥

कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वाहूनि निराळे, ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वत:शी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥

एकेदिनी परंतु, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक


- ग.दि.माडगूळकर

Thursday, 11 September 2008

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

गीत - सुरेश भट.

Monday, 1 September 2008

कळ्यांचे दिवस

कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती
येती नि जाती, येती नि जाती

नवल असे घडते काही
स्वप्नात स्वप्न पडते बाई
सख्याचा स्पर्श अनोखा हर्ष
प्रीतीच्या सारीका मंजूळ गाती

कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती
येती नि जाती, येती नि जाती

- शांताबाई शेळके

सहभाग - संवादिनी [ब्लॊग]