Friday 19 March 2010

माय मराठीचे श्लोक…!!

( वृत्त – भुजंगप्रयात )
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रम्हांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकात एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष “हर हर महादेव” झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
“अभय” एक निश्चय मनासी करावा
ध्वजा शीव ओलांडुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!


गंगाघर मुटे “अभय”

श्री  गंगाधर मुटे हे अतिशय प्रतिभावान कवी व लेखक आहेत. त्याच्या साहित्याचा [ रान मोगऱ्याचा ] सुगंध तुम्ही या वेबसाईट वर घेऊ शकता. 
सदर श्लोक हे कवीच्या परवानगीने इथे प्रकाशित केले आहेत. इतर कुठे ही प्रकाशित करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घ्यावी.

Friday 5 March 2010

जय देव जय देव जय तेंडुलकरा

[पूज्य रामदास स्वामींची क्षमा मागून , ]





सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता आनंदाची !
अविस्मरणीय खेळी तुझी द्विशतकाची !
सर्वांगी सुंदर उधळण चौकारांची !
आकाशी झळके माळ उत्तुंग षटकारांची !

जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..

१४७ चेंडू खेळपट्टी वरी उभा !
सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा !
मदतीला कार्तिक पठाण धोनी आले गा !
धावांचा डोंगर उभा राहिला बघा !
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..

दुमदुमले मैदान झाला जल्लोष !
थरथरला गोलंदाज मानिला खेद !
कडाडली बॅट चेन्डुचा शिरच्छेद !
असामान्य अद्भुत शक्तिचा शोध !
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव..
घालीन लोटांगण वन्दिन चरणं !
डोळ्याने पाहिले द्विशतक तुझे !
पोस्टर लावूनि, आनंदे पुजिन !
भावे ओवाळीन, "सचिन" नामा !

त्वमेव ब्रॅडमन, बॉर्डर त्वमेव !
त्वमेव गावसकर, लारा त्वमेव !
त्वमेव फलंदाज, गोलंदाज त्वमेव !
त्वमेव क्षेत्ररक्षक, ऑलराउन्डर त्वमेव !

गुड लेन्थ टाकले, यॉर्कर टाकले !
बाउन्सर टाकले , व्यर्थ सारे !
ड्राइव्स तू मारले, पुल तू मारले !
फ्लिक्स तू मारले, सार्थ सारे !

हरे सचिन, हरे सचिन, सचिन सचिन हरे हरे
हरे तेंडुलकर, हरे तेंडुलकर, तेंडुलकर हरे हरे !!



माझ्यामते हा अतिरेक आहे .. आणि कदाचित सचिनला ही हे  आवडणार नाही. पण एक गम्मत म्हणून वाचायला काहीच हरकत नाही . 
कवीचे नाव अज्ञात आहे म्हणजे मला माहित नाहीय
माहित असल्यास कळवावे .