Saturday 24 May 2008

बॉस .....

बॉस .....
बॉस .....

बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा...
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा...

मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून
कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'...

यथावकाश माझं लग्न झालं...
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले...
बघता बघता 'अतिपरिचित' झाले....

आणि हळूहळू पंख सैलावत जाताना
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही...

आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो...
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने
घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता'
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते...

उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा
उकरून उकरून काम करणे सोपे असते,
हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी
गुपचुप कबुल केलेए आहे मी...

- संदिप खरे

Tuesday 20 May 2008

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥

कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी
कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी
मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥

कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी
रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी
सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥

कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते
वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...


सहभाग - मिलिन्द खरे