Tuesday 20 May 2008

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥

कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी
कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी
मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥

कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी
रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी
सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥

कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते
वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...


सहभाग - मिलिन्द खरे

No comments:

Post a Comment