Thursday 26 April 2007

आरती प्रभू

लवलव करी पात, डोळं नाही थार्‍याला
एकटक पहावं कसं, लुकलूक तार्‍याला

चवचव गेली सारी, जोर नाही वार्‍याला
सुटं सूटं झालं मन, धरु कसं पार्‍याला

कुणी कुणी नाही आलं, फडफड गं राव्याची
रुणझूण हवा का ही, गाय उभी दाव्याची

तटतट करी चोळी, तुटतुटक गाठीची
उंबर्‍याशी जागी आहे, पारुबाई साठीची

--- गीतकार :आरती प्रभू
गायक :पद्मजा फेणाणी जोगळेकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट :निवडुंग

Tuesday 10 April 2007

केव्हातरी पहाटे

केव्हातरी पहाटे उलटून राञ गेली
मिटले चुकून डोळे हरवून राञ गेली

कळ्ले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळ्ले मला न केव्हा निसटून राञ गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून राञ गेली!

उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून राञ गेली!

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून राञ गेली!

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..
हलकेच कूस माझी बदलून राञ गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरुन राञ गेली?

सहभाग - ॐकार तारे