Tuesday 7 November 2006

- मंगेश पाडगावकर - १

ओळ अशी,ओळ तशी...

एखादी ओळ,
चंद्राची कोर होते,
एखादी ओळ,
नाचणारा मोर होते,

एखादी ओळ,
चढणीचा घाट असते,
एखादी ओळ,
ठुमकणारी वाट असते

एखादी ओळ,
स्वतःशीच लाजुन हासते,
एखादी ओळ,
हळुच आपले डोळे पुसते

एखादी ओळ,
केशरी जंतरमंतर असते,
एखादी ओळ,
दोघातलं अंतर असते,

एखादी ओळ,
फ़ुलपाखरा मागे धावते,
एखादी ओळ,
अंधारत दिवा लावते,

एखादी ओळ,
सरींमधे चिंब भिजते,
एखादी ओळ,
आपलेच प्रतिबिंब बनते. ..

मंगेश पाडगावकर .

No comments:

Post a Comment