Friday, 17 February 2012

रणी फडकती लाखो झेंडे..

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्रीविष्णूपरी भगवा झेंडा एकचि हा ॥ध्रु॥
शिवरायाच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाचि
दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची
तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता
पाश पटापट तुटती त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा
लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी
अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई
अधर्म लाथेने तुडवी
धर्माला गगनी चढवी
राम रणांगणी मग दावी ॥१॥
कधी न केले निजमुख काळे पाठ दावुनी शत्रुला
कृष्णकारणी क्षणही न कधि धर्माचा हा ध्वज दिसला
चोच मारण्या परव्रणावर काकापरि नच फडफडला
जणू जटायू रावणमार्गी उलट रणांगणि हा दिसला
परलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे
श्वासाश्वासासह सत्याचे संचरती जगती वारे
गगनमंदिरी धाव करी
मलिन मृत्तिका लव न धरी
नगराजाचा गर्व हरी ॥२॥
मुरारबाजी करि कारंजी पुरंदरावर हृदयाची
सुकली कुठली दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची
संभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी
अमर तयाच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी
खंडोजी कुर्वंडी कन्याप्रेमे प्रभुचरणावरुनी
स्वामिभक्तिचे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनी
हे सिंहासन निष्ठेचे
हे नंदनवन देवाचे
मूर्तिमंत हा हरि नाचे ॥३॥
स्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतिव्रता
सौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता
रमामाधवासवे पोचता गगनांतरि जळत्या ज्योती
चिन्मंगल ही चिता झळकते या भगव्या झेंड्यावरती
नसून असणे, मरून जगणे राख हो्उनी पालवणे
जिवाभावाच्या जादूच्या या ध्वजराजाला हे लेणे
संसाराचा अंत इथे
मोहाची क्षण गाठ तुटे
धुके फिटे नवविश्व उठे ॥४॥
ह्या झेंड्याचे हे आवाहन ’हरहर महादेव’ बोला
उठा हिंदुनो अंधारावर घाव निशाणीचा घाला
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती
झंजावाती पोटी येउन पान हलेना हाताने
कलंक असला धुवुन काढणे शिवरायाच्या राष्ट्राने
घनचक्कर या युद्धात
व्हा राष्ट्राचे राउत
कर्तृत्वाचा द्या हात ॥५॥

वि. स. खांडेकर

shared with me .- Hemant Rajopadhye

Monday, 30 August 2010

शेर शिवराज है

इंद्र जिमि जृंभपर !
बाडव सुअंभपर !
रावण सदंभपर !
रघुकुल राज है !!

पौन वारिवाह पर !
संभु रतिनाह पर !
ज्यो सहसवाह पर !
राम द्विज राज है !

दावा दृमदंड पर !
चिता मृगझुंड पर !
भूषण वितुंड पर !
जैसे मृगराज है !!

तेज तमंअंस पर !
कन्न्ह जिमि कंस पर !
त्यों म्लेंच्छ बंस पर !
शेर शिवराज है !!

शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!



शक्र जिमि शैलपर,
अर्क तमफैलपर,
बिघन की रैलपर,
लंबोदर देखीये !

राम दसकंधपर,
भीम जरासंधपर,
भूषण ज्यो सिंधुपर,
कूंभज विसेखिये !

हर ज्यो अनंगपर,
गरुड ज्यो भूज़ंगपर,
कौरवके अंगपर,
पार्थ ज्यो पेखीये !

बाज ज्यो बिहंगपर,
सिंह ज्यो मतंगपर,
म्लेंच्छ चतुरंगपर,
शिवराज देखीये !!

शिवराज देखीये !! शिवराज देखीये !!
शिवराज देखीये !! शिवराज देखीये !!

Friday, 19 March 2010

माय मराठीचे श्लोक…!!

( वृत्त – भुजंगप्रयात )
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रम्हांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकात एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष “हर हर महादेव” झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
“अभय” एक निश्चय मनासी करावा
ध्वजा शीव ओलांडुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!


गंगाघर मुटे “अभय”

श्री  गंगाधर मुटे हे अतिशय प्रतिभावान कवी व लेखक आहेत. त्याच्या साहित्याचा [ रान मोगऱ्याचा ] सुगंध तुम्ही या वेबसाईट वर घेऊ शकता. 
सदर श्लोक हे कवीच्या परवानगीने इथे प्रकाशित केले आहेत. इतर कुठे ही प्रकाशित करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घ्यावी.

Friday, 5 March 2010

जय देव जय देव जय तेंडुलकरा

[पूज्य रामदास स्वामींची क्षमा मागून , ]





सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता आनंदाची !
अविस्मरणीय खेळी तुझी द्विशतकाची !
सर्वांगी सुंदर उधळण चौकारांची !
आकाशी झळके माळ उत्तुंग षटकारांची !

जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..

१४७ चेंडू खेळपट्टी वरी उभा !
सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा !
मदतीला कार्तिक पठाण धोनी आले गा !
धावांचा डोंगर उभा राहिला बघा !
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..

दुमदुमले मैदान झाला जल्लोष !
थरथरला गोलंदाज मानिला खेद !
कडाडली बॅट चेन्डुचा शिरच्छेद !
असामान्य अद्भुत शक्तिचा शोध !
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव..
घालीन लोटांगण वन्दिन चरणं !
डोळ्याने पाहिले द्विशतक तुझे !
पोस्टर लावूनि, आनंदे पुजिन !
भावे ओवाळीन, "सचिन" नामा !

त्वमेव ब्रॅडमन, बॉर्डर त्वमेव !
त्वमेव गावसकर, लारा त्वमेव !
त्वमेव फलंदाज, गोलंदाज त्वमेव !
त्वमेव क्षेत्ररक्षक, ऑलराउन्डर त्वमेव !

गुड लेन्थ टाकले, यॉर्कर टाकले !
बाउन्सर टाकले , व्यर्थ सारे !
ड्राइव्स तू मारले, पुल तू मारले !
फ्लिक्स तू मारले, सार्थ सारे !

हरे सचिन, हरे सचिन, सचिन सचिन हरे हरे
हरे तेंडुलकर, हरे तेंडुलकर, तेंडुलकर हरे हरे !!



माझ्यामते हा अतिरेक आहे .. आणि कदाचित सचिनला ही हे  आवडणार नाही. पण एक गम्मत म्हणून वाचायला काहीच हरकत नाही . 
कवीचे नाव अज्ञात आहे म्हणजे मला माहित नाहीय
माहित असल्यास कळवावे .

Friday, 26 June 2009

मालवून टाक दीप

मालवून टाक दीप चेतवून अंग-अंग !
राजसा किती दिसांत लाभला निवांत संग !
त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात;
हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्नभंग !
गारगार या हवेत, घेउनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग !
दूरदूर तारकात बैसली पहाट न्हात:
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग !
हे तुला कसे कळेल ? कोण एकटे जळेल ?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग ?
काय हा तुझाच श्वास ? दर्वळे इथे सुवास !
बोलरे हळू उठेल चांदण्यावरी तरंग !




गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगशकर

Thursday, 25 June 2009

श्रावण मासि हर्ष मानसी

श्रावण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत.............

Monday, 8 June 2009

गंजल्या ओठास

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो;
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो;
सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
आणु दे गा वंचकांना क्रूस छ्द्माचा दयाळा;
रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकळू दे !

गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - रवींद्र साठे
चित्रपट - उंबरठा (१९८१)

Tuesday, 12 May 2009

कशासाठी अणि जगावे कसे मी ? |

कशासाठी अणि जगावे कसे मी ? |
विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी ||
जगू पांग फेडावया मायभुचे |
आम्ही मार्ग चालू जीजाऊ सुताचे ||

देहास मानूनी जगा नित पायपोस |
झुन्झा अखंड करण्या आपूला स्वदेश ||
होऊ नका चुकुर हे ह्रुद्गत कठुनी |
संदेश अन्तिम दिला शिवभुपतीनी ||

उरी ध्येय ज्वाला असे पेटलेली |
अशाना करी लागती ना मशाली ||
रवि नित्य तेवे विना तेलवात |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||

संभाजी मंत्र तद्वत उरी ज्या शिवाजी |
मारेल मृत्यु वरही रणी नित्य बाजी ||
हे हिंदुराष्ट्र करण्या रविवत ज्वलंत |
हे बीजमंत्र भिनवू मनशोणितात ||

माघार ठावी न कधी आम्ही मातृभक्त |
राष्ट्रार्थ जीवन जगू शतधा विरक्त ||
चित्तात साठवू सदा शिवभुपतीस |

Tuesday, 5 May 2009

आलाप

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो...कुठेतरी दैव नेत होते!

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?

कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना...
करु तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते!

असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!

जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!

बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!

मला विचारु नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणा-या हवेत होते!


कवी : सुरेश भट.

Saturday, 18 April 2009

आम्ही कोण ?

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।
दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके ॥ १ ॥

सारेही बडिवार येथिल पाहा! आम्हापुढे ते फिके ।
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूप्रती द्यावया ॥
सौन्दर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजी या ।
फोले पाखडिता तुम्ही, निवडतो ते सत्त्व आम्ही निके ! ॥ २ ॥

शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे ? ।
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ? ॥
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे ।
ते आम्हीच, शरण्य मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते ! ॥ ३ ॥

आम्हाला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे ।
आम्हाला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे ! ॥

Sunday, 28 December 2008

देवा, मला रोज एक अपघात कर ..

देवा, मला रोज एक अपघात कर

आणि तिच्याच हातांनीच ...
आणि तिच्याच हातांनीच ...जखमा या भर

देवा, मला रोज एक अपघात कर ..
देवा, मला रोज एक अपघात कर ..


कधीतरी कुठे तरी बसावी धडक
कळ मला यावी तिला कळावी तड़क
घायाळाला मिळो एक घायाळ नजर.. हाय ..
देवा, मला रोज एक अपघात कर

अपघाती सोंग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम मला वाटावे बरे
दवा दारू मधे .. कुठे असतो असर
देवा, मला रोज एक अपघात कर

खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेल जेव्हा, कुठे दुखते तुला?
जरा डावीकडे.. जरा पोटाच्या या वर
देवा, मला रोज एक अपघात कर

टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका, उडे आभाळाच्या पार
व्यथांचाच काय, पड़े जगाचा विसर
देवा, मला रोज एक अपघात कर

देवा, मला रोज एक अपघात कर

आणि तिच्याच हातांनीच जखमा या भर
देवा, मला रोज एक अपघात कर ..

Tuesday, 7 October 2008

तेच ते

तेच ते नि तेच ते,
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा, तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

खानावळीही बदलून पाहिल्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकूपासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते


- विंदा करंदीकर

Wednesday, 1 October 2008

आठवतं तुला ?

आठवतं तुला ?
आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं .
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं .

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता .
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता .

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो .
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो .

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती.
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं ?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं .



- संदिप खरे

Tuesday, 16 September 2008

एका तळ्यात होती



एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥

कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वाहूनि निराळे, ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वत:शी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥

एकेदिनी परंतु, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक


- ग.दि.माडगूळकर

Thursday, 11 September 2008

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

गीत - सुरेश भट.

Monday, 1 September 2008

कळ्यांचे दिवस

कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती
येती नि जाती, येती नि जाती

नवल असे घडते काही
स्वप्नात स्वप्न पडते बाई
सख्याचा स्पर्श अनोखा हर्ष
प्रीतीच्या सारीका मंजूळ गाती

कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती
येती नि जाती, येती नि जाती

- शांताबाई शेळके

सहभाग - संवादिनी [ब्लॊग]

Thursday, 28 August 2008

सरणार कधी

सरणार कधी रण प्रभु तरी
हे कुठवर साहू घाव शिरी ?

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजुन जळते अंतर ज्योती
कसा सावरू देह परी?

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती आतून
मिटाय झाले अधीर लोचन
खड्ग गळाले भूमिवरी

पावन खिंडीत पावन होऊन
शरीर पिंजे तो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता तरी ?

असं वाटत नाही

हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
या जगण्याचे ही कारण नक्की काय, अजून धाट्त नाही

दु:खावर मी केली अश्शी मात,
हसता हसता दुखून आले दात,
आरसा म्हणतो हसणा-या बाळा, मी फसत नाही !

माझे जिणे भरभरलेले ढग,
पाण्याने या पोटी लागे रग,
देवाजी ची किमया हे पाणी कधी आटत नाही !

चालत रहाण्यासाठी जो हट्टी,
त्याची नेहमी खड्ड्यांशी गट्टी,
अस्सा मी प्रवासी त्याला गाव कधी भेटत नाही !

हाती येता कागद लिहीतो मी,
आपली आपण टाळी घेतो मी,
शब्दांनी या बेरड होता पान कधी फाटत नाही !

दुर्दैवाच्या दुर्दैवाते ते
माझ्या रूपे निर्लज्जा भेटे,
कानी देते धमक्या ते हजार मी बधत नाही !

हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
या जगण्याचे ही कारण नक्की काय, अजून धाट्त नाही


- संदिप खरे

Saturday, 24 May 2008

बॉस .....

बॉस .....
बॉस .....

बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा...
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा...

मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून
कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'...

यथावकाश माझं लग्न झालं...
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले...
बघता बघता 'अतिपरिचित' झाले....

आणि हळूहळू पंख सैलावत जाताना
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही...

आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो...
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने
घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता'
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते...

उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा
उकरून उकरून काम करणे सोपे असते,
हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी
गुपचुप कबुल केलेए आहे मी...

- संदिप खरे

Tuesday, 20 May 2008

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥

कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी
कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी
मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥

कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी
रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी
सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥

कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते
वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...


सहभाग - मिलिन्द खरे